जिल्ह्यात “हर घर संविधान” उपक्रमातून संविधान जनजागृती अभियाननागरिकांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0
9

प्रतिनिधी :जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 25 : जिल्ह्यात 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत “हर घर संविधान” या संकल्पनेतून भारतीय संविधान जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विद्यार्थीवर्गाने आणि संविधानप्रेमींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे संविधानातील मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांविषयी जनजागृती करणे व नागरिकांमध्ये घटनात्मक भावना बळकट करणे.

या अभियानाची सुरुवात 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ऐतिहासिक बिंदू चौक, कोल्हापूर येथे होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, आश्रमशाळा आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी स्पर्धा, कार्यशाळा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात निबंध लेखन, भाषण, वादविवाद, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला, पथनाट्य आणि देशभक्तीपर सादरीकरणांचा समावेश असेल.

प्रत्येक शाळा-महाविद्यालयाच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका प्रदर्शित केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांकडून दररोज परिपाठात प्रस्ताविकेचे वाचन करणे, वाचनालयात संविधानाच्या प्रति उपलब्ध करून देणे आणि संविधानावर आधारित व्याख्याने आयोजित करणे यावर विशेष भर दिला जाईल.

येणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानातील मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांनी आपल्या अधिकार आणि कर्तव्यांविषयी जागरूक राहावे, तसेच संविधानाचे तत्त्वज्ञान समजून घेऊन त्याची अंमलबजावणी दैनंदिन जीवनात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here