
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर दि : 24 (जिमाका) येथील NCC गट मुख्यालय (कोल्हापूर) यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे दि 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पन्हाळा ते विशालगड या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला आजपासून सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्र संचालकालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या मोहिमेला झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री त्यागी म्हणाले , मानवी जीवनातील उद्दिष्ट हे स्वंय शिस्तीद्वारे साध्य करता येते.या ट्रॅकमध्ये सहभागी विद्यार्थांनी सावधानता व सुरक्षा बाळगून ही मोहिम पूर्ण करायची आहे.NCC मध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि राष्ट्रीय सेवा मुल्यांना प्राधान्य असते. या बाबी विद्यार्थांनी कधीही नजरेआड करू नयेत. अशा मोहिमांमुळे विद्यार्थांमध्ये संस्कृतीचे आदान प्रदान होते. त्यांच्यामध्ये एकोप्याची, समानतेची भावना वाढीस लागते असे सांगून या मोहिमेत सहभाग नोंदविलेल्या सर्व विद्यार्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी नाईक हिने इंग्रजी तर सिनिअर अंडर ऑफिसर आर्णि पटेल या विद्यार्थीने हिंदी मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास , पन्हाळा – विशालगड येथील समरप्रसंग आणि एनसीसी मुख्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश सांगितला. या मोहिमेत दिल्ली व गुजरात राज्यातील सुमारे 265 विद्यार्थी सामील झाले असून ही मोहीम 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. टप्प्या टप्याने 12 राज्यातील विद्यार्थी या मोहिमेमध्ये सामील होणार आहेत.या ट्रॅक मोहिमेत मुलींची एक स्वतंत्र तुकडी राहणार आहे.अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन,कादंबरी पाटील हिने केले. यावेळी ब्रिगेडियर आर.के पैठणकर , कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन,ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई ,5 महाराष्ट्र बटालियन (कोल्हापूर) कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांच्यासह मुख्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


