
प्रतिनिधी :जानवी घोगळे
मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधांसह कायदा व सुव्यवस्थेबाबत घेतला आढावा
कोल्हापूर, दि. २५ : कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १३ नगरपालिकांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी वडगाव, जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड या ठिकाणी भेटी दिल्या.

मतदान केंद्रांना भेट देताना पिण्याचे पाणी, स्वच्छता, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मतदार व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा अशा ‘एएमएफ’ (Assured Minimum Facilities) ची पूर्तता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले. तसेच स्थायी निरीक्षण पथकांच्या (SST) ठिकाणी भेटी देऊन वाहन तपासणीची संख्या वाढवावी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना केल्या.

या दौऱ्यात मतदान यंत्र स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रे, साहित्य वाटप केंद्रे, मतपेट्या संकलन केंद्रे तसेच मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या. मतदान केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, मतमोजणी केंद्रांची तयारी, मतपेट्या व ईव्हीएमची वाहतूक इत्यादी सर्व बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. यावेळी जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

जयसिंगपूर येथे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
दुबार नाव असलेल्या मतदारांबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे
आगामी नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या मतदारांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी (दुबार) आढळली आहेत, अशा नोंदींवर प्रारूप व अंतिम मतदारयादीमध्ये दोन तारका (**) हे विशेष चिन्ह लावण्यात आले आहे. अशा संशयित नोंदींची नाव, लिंग, पत्ता व फोटो यांच्या आधारे स्थानिक स्तरावर स्वतंत्र पडताळणी करण्यात येत आहे.

ज्या मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वार्ड किंवा मतदान केंद्रावर आहे, त्याच्याकडून ठराविक नमुन्यातील लेखी हमीपत्र घेऊन नेमके कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याची नोंद घेतली जात आहे. मतदाराने लेखी दिल्यानंतर त्या मतदाराला इतर कोणत्याही केंद्रावर मतदान करता येणार नाही. जर मतदाराने आधी प्रतिसाद दिला नसेल, तरी मतदानाच्या दिवशी केंद्रावर आल्यावर त्याच्याकडून जागेवरच हमीपत्र घेऊन ओळख पडताळल्यानंतरच मतदानाची परवानगी देण्यात येईल. याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.



