
प्रतिनिधी :जानवी घोगळे
पुणे :
गेस्टम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमातून पुणे जिल्हा रुग्णालयाला महिला व बाल आरोग्य, सुरक्षा आणि जनजागृती सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तीन अत्याधुनिक वाहनांचे देणगीस्वरूपात वितरण करण्यात आले.
आरोग्य भवन, पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या वाहनांचा औपचारिक स्वीकार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला. या वाहनांच्या मदतीने जिल्ह्यातील दुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे अधिक सुलभ होणार असून आपत्कालीन प्रसंगी महिलांना आणि बालकांना तातडीची सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाला होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलिन डीवाल्टर, मुख्य संचालन अधिकारी शकील शेख, गेस्टम्प ऑटोमोटिव्हचे प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत महत्त्वपूर्ण वाढ होणार असून, जनजागृती मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे आणि आपत्कालीन सेवा अधिक परिणामकारकपणे राबविण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


