मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५

प्रतिनिधी :जानवी घोगळे
आजच्या संविधान दिनाचा आनंद द्विगुणित :युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा, अपूर्व क्षण
मुंबई, दि. २६:- महाराष्ट्र शासनाने युनेस्कोच्या मुख्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेट म्हणून दिला होता. आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्याने युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात संविधान दिनीच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा दिमाखात उभा राहिला.

‘हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनेस्कोच्या संबंधित सर्व पदाधिकारी, वरिष्ठाधिकारी यांचे आभार मानले आहेत. ते म्हणतात, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेने आणि प्रतिभेने जगाला समता-बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारताला मिळालेले संविधान हे त्यांच्या उत्तुंग अशा कर्तुत्वाचा अविष्कार आहे. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनीच अनावरण हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला मिळालेल्या संविधानप्रती व्यक्त झालेला परमोच्च आदराचा क्षण आहे. आम्ही हा क्षण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती अभिवादनाची संधी मानतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि हा पुतळा उभा रहावा, यासाठी प्रयत्नशील अशा सर्वांचे अभिनंदनही करतो. यानिमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे.

युनेस्कोच्या मुख्यालयात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. याप्रसंगी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी आणि त्याचे संग्रहालयात रूपांतरण केले आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठातही डॉ. बाबासाहेबांचा पुतळा उभा राहिला आहे.
आता मुंबईतील इंदुमिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामालाही वेग दिला आहे, याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत.



