
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 2 l— कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. या कालावधीत एकूण *45.90 टक्के मतदान झाले असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील 318 मतदान केंद्रांवर एकूण 2,55,737 मतदारांपैकी 1,17,393 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 56,916 पुरुष, 60,472 महिला आणि 5 इतर मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांचा सहभाग तुलनेने अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
प्रशासनाच्या नियोजनबद्ध तयारीमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठेही अनुचित घटना घडलेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नगरपरिषदांमध्ये मतदानाची स्थिती
जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमध्ये खालीलप्रमाणे मतदान झाले —
- मलकापूर – 58.07% (4,934 पैकी 2,865 मतदारांनी मतदान)
- वडगाव – 56.25% (23,044 पैकी 12,963)
- पन्हाळा – 54.80% (2,967 पैकी 1,626)
- मुरगूड – 54.68% (10,128 पैकी 5,538)
- कुरुंदवाड – 52.52% (22,224 पैकी 11,671)
- कागल – 50.28% (28,753 पैकी 14,457)
- शिरोळ – 44.83% (24,539 पैकी 11,000)
- गडहिंग्लज – 44.36% (30,161 पैकी 13,380)
- हुपरी – 41.17% (24,802 पैकी 10,210)
- जयसिंगपूर – 31.18% (49,747 पैकी 15,512)
जयसिंगपूरमध्ये तुलनेने मतदान कमी झाले असले तरी दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील मतदान
तीन नगरपंचायतींमध्येही समाधानकारक मतदान झाले आहे —
- चंदगड – 54.46% (8,315 पैकी 4,528)
- आजरा – 52.25% (14,686 पैकी 7,673)
- हातकणंगले – 52.20% (11,437 पैकी 5,970)
ग्रामीण व अर्धशहरी भागात मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
प्रशासन सतर्क, मतदान शांततेत
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून कुठेही अप्रिय घटना घडलेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वृद्ध, दिव्यांग व महिला मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
दुपारनंतर व संध्याकाळी मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

