
प्रतिनिधी : जानवी घोगळे
पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील २५ गुणवंत विद्यार्थ्यांनी नुकताच अमेरिकेचा १२ दिवसांचा शैक्षणिक दौरा पूर्ण करून मायदेशी पुनरागमन केले. नासा, केनेडी स्पेस सेंटर, सिलिकॉन व्हॅली, स्मिथसोनियन म्युझियम यांसारख्या जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विज्ञान केंद्रांना भेट देत या विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमानप्रवास होता, तर जगातल्या सर्वात आधुनिक संशोधन केंद्रांना पाहण्याचीही ही पहिली संधी होती.
पुणे जिल्हा परिषद व इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पा’ अंतर्गत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील तब्बल १७,००० विद्यार्थ्यांमधून तीन टप्प्यांच्या कठोर निवड प्रक्रियेनंतर ९ मुली व १६ मुलगे अशा २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या दौऱ्यात IUCAAचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे हे मार्गदर्शक म्हणून त्यांच्यासोबत होते.
ऐतिहासिक विमानांपासून अंतराळ संशोधनापर्यंत प्रवास
अमेरिकेत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममधील उडवार-हॅझी सेंटरला भेट दिली. येथे राईट बंधूंचे पहिले विमान, एनोलागे, डिस्कव्हरी स्पेस शटल तसेच कॉनकॉर्ड यांसारखी ऐतिहासिक विमाने आणि अंतराळयान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर व्हाईट हाऊस, नॅशनल आर्काइव्हज आणि वॉशिंग्टन, लिंकन व आईन्स्टाईन यांच्या स्मारकांना भेट देत विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या इतिहासाचाही अभ्यास केला.
वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावासात भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद झाला. अर्थ इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये हवामान बदल, समुद्र पातळी वाढ, पर्यावरणावरील परिणाम याविषयी शास्त्रज्ञांकडून सविस्तर माहिती मिळाली.
चंद्रशिळा स्पर्शाचा अविस्मरणीय अनुभव
स्मिथसोनियन एअर अँड स्पेस म्युझियममध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला आणि अपोलो अंतराळ मोहिमेतून आणलेली चंद्रशिळा (मून रॉक) स्पर्श करण्याची संधी मिळाली. या क्षणाने अनेक विद्यार्थी भारावून गेले.
केनेडी स्पेस सेंटर येथे विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक अंतराळ मोहिमांची माहिती घेतली, रॉकेट्स पाहिले, आणि व्हर्च्युअल रिऍलिटीच्या साहाय्याने दुसऱ्या ग्रहावर चालल्याचा अनुभव घेतला. तसेच ‘अस्ट्रोनॉट ट्रेनिंग’ सत्रांमध्ये त्यांनी टीमवर्क, संवादकौशल्य व विविध प्रयोगात्मक कृती केल्या.
लोनिकंद जिल्हा परिषद शाळेची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी श्रावणी मगर म्हणाली,
“चंद्रशिळा हातात धरायला मिळाली, अंतराळवीरांसारखे प्रशिक्षण अनुभवता आले. आता मला अंतराळवीर बनायचं स्वप्न पडलं आहे. कधी कल्पनाही केली नव्हती की मी विमानात बसेन आणि नासाला भेट देईन.”
त्या वेळी सोबत असलेल्या शिक्षिका माया लांगे यांनी सांगितले,
“विद्यार्थ्यांना भाषेचा अडथळा येईल असे वाटले होते, पण त्यांनी शास्त्रज्ञ सांगत असलेली सगळी माहिती समजून घेतली. हा दौरा त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरला आहे.”
सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञानाचा अनुभव
सॅन फ्रान्सिस्को येथे विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियम आणि टेक इंटरअॅक्टिव्ह म्युझियमला भेट दिली. रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित उपक्रमांत ते सहभागी झाले. भारतीय शास्त्रज्ञांशी संवाद साधून संशोधन आणि करिअरच्या संधींबाबत माहिती मिळाली.
गालंदवाडी शाळेतील सातवीचा विद्यार्थी आयुष शेलार म्हणाला,
“नासा मध्ये शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर मला समजले की विज्ञानासाठी किती मेहनत आणि समर्पण लागते. मला एक दिवस अंतराळाचा शोध घ्यायचा आहे.”
गुगल आणि अॅपल या जगप्रसिद्ध कंपन्यांना विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथील कामकाज आणि नवकल्पनांची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहायला मिळाली. गुगलमध्ये ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची कन्या गिरिजा नारळीकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठात भारतीय प्राध्यापकांनी त्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी समजावून सांगितल्या.
प्रेरणादायी समारोप
गोल्डन गेट ब्रिज, लॉम्बार्ड स्ट्रीट आणि कॅलिफोर्निया सायन्स सेंटरला भेट देऊन दौऱ्याचा समारोप झाला. येथे विद्यार्थ्यांनी प्लॅनेटेरियम शो पाहिला तसेच भूकंपाची कृत्रिम अनुभूती देणारा विभागही अनुभवला.
या उपक्रमामुळे महाराष्ट्रात नासाला भेट देणारा पुणे हा पहिला जिल्हा ठरला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वप्ने आणि आव्हाने उभी करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले,
“प्रत्येक गावातील मुलामुलींमध्ये प्रचंड प्रतिभा दडलेली आहे. योग्य संधी दिल्यास ते काहीही करू शकतात. हा उपक्रम दरवर्षी राबवला जाईल. जानेवारीपासून पुढील वर्षासाठी NCL, IISER, DRDO, ISRO आणि NASAसारख्या संस्थांना भेटींचा समावेश असलेला कार्यक्रम सुरू करण्यात येईल. IUCAAसोबत सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठीही प्रयत्न सुरू आहेत.”
या दौऱ्यानंतर पुण्यातील या विद्यार्थ्यांनी विज्ञान, अंतराळ संशोधन आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याचे नवे स्वप्न उराशी बाळगले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा दौरा केवळ एक प्रवास नव्हता, तर नव्या भविष्याची दारे उघडणारा प्रेरणादायी टप्पा ठरला आहे.

