
कोल्हापूर प्रतिनिधी–पांडुरंग फिरिंगे
मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला भगवद्गीतेचा दिव्य उपदेश दिला त्या पवित्र दिवसाचे औचित्य साधत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे गीता जयंती महामहोत्सवानिमित्त भगवद्गीता व इतर अध्यात्मिक पुस्तकांचे वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
हा उपक्रम महाविद्यालयातील विद्यार्थी यश राजेंद्र माने यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. मागील दोन–तीन वर्षांपासून अध्यात्मिक साधनेत सक्रिय असलेले यश यांनी सांगितले की,
“युवा पिढीला योग्य आध्यात्मिक पाया मिळावा, त्यांच्या जीवनाला सद्गुणांचा आणि ज्ञानाचा दिशादर्शक प्रकाश मिळावा या प्रामाणिक हेतूने हा उपक्रम आयोजित केला आहे.”
गीता जयंतीचा ऐतिहासिक महिमा
सुमारे 5000 वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे सार, धर्म, कर्तव्य आणि आत्मज्ञानाचा उपदेश दिला. भगवद्गीता जयंती म्हणजे मानवजातीला प्राप्त झालेल्या अध्यात्मिक ज्ञानदिपाची स्मृती.
मार्गशीर्ष महिन्यात इस्कॉन संस्थेच्या भक्तांच्या वतीने देशभरात गीता व आध्यात्मिक पुस्तकांचे विशेष वितरण केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून हा उपक्रम विवेकानंद कॉलेजमध्ये राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
११ आणि १२ डिसेंबर रोजी आयोजित या गीता वितरण कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. पुस्तकवाटपाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच भगवद्गीतेचा प्रत्यक्ष परिचय करून घेतला.
या प्रसंगी मुरलीधर गावडे, हितेंद्र साळुंखे, प्राचार्य एस.पी.थोरात,प्रा.अशोक पाटील , आर.आर.साळुंखे,तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, सहशिक्षक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पडला.
युवा पिढीला अध्यात्मिकतेची नवी जोड
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिकतेबद्दल उत्सुकता आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले. ज्ञान, मूल्य शिक्षण, कर्तव्यभावना आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गीतेसारख्या ग्रंथांचा समावेश आवश्यक असल्याचे अनेक शिक्षकांनी नमूद केले.

