
प्रतिनिधी :जानवी घोगळे
शिरसाठे, ता. इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे परिसरातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे थंडीच्या दिवसांत ऊबदार कपड्यांशिवाय शाळेत जातात. सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेटर व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आदिवासी पाड्यांवर जाऊन गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. स्वेटर वितरणासोबतच रस्ते सुरक्षा व पर्यावरण संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री गणेश रणदिवे (विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, नाशिक) यांनी पर्यावरण संवर्धन, पर्यावरणाचे महत्त्व, वन्य प्राण्यांचे जीवन, वन्य प्राण्यांच्या सवयी, प्राणी आपल्यावर हल्ल्या करतात त्यावेळी हल्ल्यापासून आपण कसा बचाव करावा यावर विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री प्रवीण सोनवणे (सहाय्यक मोटार वाहन नियंत्रक) यांनी वाहतुकीचे नियम, हेल्मेटचे महत्त्व आणि इंधन बचतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.मा. सौ. स्नेहल देव (अध्यक्षा, नमस्ते नाशिक फाउंडेशन) यांनी मूल्यशिक्षण, शिस्त, व्यक्तिमत्त्व विकास आणि विद्यार्थ्यांनी स्वप्ने कशी मोठी ठेवावीत याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्नेहल देव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. सार्जेंट श्री. संपत नाना पाटील “तिरंगा भारत” व श्रीम. शारदा सोनवणे यांनी भारतीय सेना, एअर फोर्स आणि देशसेवेची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या हस्ते शाळेला स्मृतीचिन्हही प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सदगीर, श्री अमृता चोथे, गावातील बंधू-भगिनी, दिगंबर येलमामे दशरथ गांगुर्डे तुकाराम येलमामे बाळू चंद्रगीर तसेच तरुण मित्रमंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुख्याध्यापक श्री गणेश पवार, श्री कुणाल चव्हाण, श्रीमती दिप्ती छत्रे, श्री रामदास शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मधुकर धनगर यांनी केले.
नमस्ते नाशिक फाउंडेशन — “जिथे कमी, तिथे आम्ही” शिरसाठे गावातील गरजू विद्यार्थ्यांना उब आणि शिक्षणाची साथ मिळवून देणारा हा उपक्रम समाजिक संवेदनशीलतेचा सुंदर नमुना ठरला.

