
कोल्हापूर प्रतिनिधी: पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आयोजित ‘गोकुळश्री’ दूध उत्पादन स्पर्धेत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. ११४ स्पर्धकांमध्ये केर्लीचे विश्वास यशवंत कदम यांच्या जाफराबादी म्हशीने २१ लि. ९५५ मि.ली. दूध देत म्हैस गटात प्रथम क्रमांक पटकावला.
तर रांगोळीचे युवराज विठ्ठल चव्हाण यांच्या एच.एफ. गायीने ३५ लि. ८७० मि.ली. दूध देत गाय गटात अव्वल स्थान मिळवले.
गेल्या ३२ वर्षांपासून ही स्पर्धा गोकुळतर्फे घेण्यात येते. उत्पादकांना प्रोत्साहन, जातिवंत जनावरांचा विकास, दूध उत्पादन वाढ आणि तरुणांना दुग्धव्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरत असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले. वाढत्या सहभागामुळे उत्पादक जनावरांच्या उत्पादन क्षमतेत सातत्याने सुधारणा करत असल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.
विजेत्यांना दिलेली बक्षिसे —
म्हैस गट :
१) विश्वास कदम – ₹35,000
२) विजय दळवी – ₹30,000
३) सौ. वंदना जरळी – ₹25,000
गाय गट :
१) युवराज चव्हाण – ₹25,000
२) महेश तवनोजी – ₹20,000
३) दीपक सावेकर – ₹15,000
गोकुळच्या दूध संकलन विभागाने पारदर्शक आणि निकोप पद्धतीने स्पर्धा पार पाडली. पुढील वर्षी अधिकाधिक उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

