
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन व न्यू इंग्लिश स्कूल, पाडळी खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे ॲडिशनल पोलिस अधीक्षक मा. डॉ. धीरज कुमार (IPS) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे तहसीलदार मा. संदीप पाटील, पाडळी खुर्द गावचे सरपंच मा. तानाजी पालकर, तंटामुक्ती अध्यक्ष मा. सिताराम पाटील, तसेच युवा नेते मा. पृथ्वीराज सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. धीरज कुमार यांनी विद्यार्थ्यांना समाजातील बदल, मूल्यशिक्षण आणि सुसंस्कारित नागरिक घडविण्याचे महत्त्व पटवून दिले. “आजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे. शाळा हेच विद्यार्थ्यांच्या चारित्र्यनिर्मितीचे पहिले विद्यापीठ असून शिक्षक व पालक यांच्या समन्वयातूनच गुणवंत विद्यार्थी घडतात,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस विभाग सदैव सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन वर्षभरात सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असते. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महापरिनिर्वाण दिनाच्या या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील कुस्ती, रग्बी, क्रिकेट, फुटबॉल तसेच स्पर्धा परीक्षा, पोलीस व आर्मी भरतीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा. सुनील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माननीय संदीप पाटील यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव सुरेश कांबळे, डे. सरपंच प्रकाश पाटील, सुहास मोहिते, महेश कांबळे (महावितरण), मच्छिंद्र कामत, प्रा. भरत ढेरे, महसूल अधिकारी प्रसाद पाटील, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आर. जी. कांबळे सर यांनी केले.

