
शिक्षक संघाचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर जंगी धरणे आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
कनिष्ठ महाविद्यालय संच मान्यतेतील गंभीर त्रुटी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघ यांच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथे भव्य एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न झाले.
सन 2025-26 शिक्षक संघ मान्यता ऑनलाईन प्रक्रियेत 20 वर्षांवरील विद्यार्थ्यांना ग्राह्य धरणे, एटीकेटी विद्यार्थ्यांना मान्यता देणे, तसेच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया फक्त महानगरपुरती मर्यादित ठेवणे, या प्रमुख मागण्यांसह शिक्षकांना जाचक ठरणाऱ्या विविध अटी रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली.
शिक्षक संघाचे प्रतिनिधीमंडळाने या सर्व मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक मा. कोळेकर मॅडम यांना सादर केले.
आंदोलनात ठोस भूमिका – नेतृत्वकर्त्यांची दमदार भाषणे
धरणे आंदोलनाची प्रस्तावना उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे यांनी करताच वातावरण उत्साहवर्धक झाले.
प्रा. प्रशांत मेधावी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे मांडलेले मुद्देसूद विवेचन सर्वांच्या टाळ्यांचा विषय ठरले.
शाळा कृती समितीचे बाबा पाटील आणि DCPS संघटनेचे प्रा. करणसिंह गायकवाड यांनीही समर्पक भाषणातून सरकारी धोरणांतील विसंगतींवर काटेरी प्रकाश टाकला.
“जाचक अटी रद्द झाल्याशिवाय शांत बसणार नाही!” — संघटनेचा इशारा
संघटनेचे अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी यांनी शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटनेची ठाम भूमिका स्पष्ट करताना सरकारला इशारा दिला की,
“कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या अटी रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.”
तसेच सरचिटणीस प्रा. संजय मोरे यांनी वर्तमान संच मान्यतेतील जाचक अटी, वर्ग-तुकड्यांवरील घातक परिणाम आणि शिक्षकांच्या समस्यांवर सखोल मार्गदर्शन करून आंदोलन का अपरिहार्य ठरले हे स्पष्ट केले.
महासंघाचा पाठिंबा – 500 पेक्षा अधिक शिक्षकांची हजेरी
महासंघाचे माजी कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या वर्तमान समस्यांवर प्रकाश टाकत संघटनेला जाहीर पाठिंबा दिला.
या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी, सरचिटणीस प्रा. संजय मोरे, उपाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे, प्रा. अमर चव्हाण, प्रा. कॅ. डॉ. अमित रेडेकर, प्रा. प्रशांत मेधावी, प्रा. व्ही. टी. कांबळे, प्रा. सुनील भोसले, प्रा. बी. के. मडीवाळ, प्रा. आर. बी. गावडे, प्रा. प्रकाश बोकडे, प्रा. ऐश्वर्या पालकर, प्रा. संध्या नागन्नावर यांच्यासह 500 हून अधिक शिक्षक बांधव-भगिनींची उपस्थिती आंदोलनाला मोठा उर्जा-वेग देणारी ठरली.

