
प्रतिनिधी : जानवी घोगळे
गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळ व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.
नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

भारतीय संविधान हे जगातील एक सर्वोत्तम संविधान आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा विविध संस्थानांमध्ये विभाजित होता. देशात सांस्कृतिक ऐक्य होते, मात्र राजकीय ऐक्य नव्हते. त्यामुळे सर्वांना एकत्र करत सर्वांगीण विचार करून संविधान तयार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मूल्य जपणाऱ्या विविध देशाच्या लोकशाहीचा अभ्यास केला, आणि आपल्या देशातील शाश्वत मूल्यांवर आधारित संविधान निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तक प्रकाशनप्रसंगी सांगितले.
संविधानाची माहिती अत्यंत सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणावर आधारित हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत संविधान सर्वांपर्यंत पोहोचवेल. या पुस्तकाचा अनुवाद इतर भाषेतही व्हावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
जनसामान्यांना सोप्या शब्दात संविधानाची माहिती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या भाषणाची पुस्तक रूपात ओळख होण्याची गरज होती. या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत संविधानिक विचार सोप्या शब्दात पोहोचतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.


