
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे:
मराठा साम्राज्याच्या अजरामर इतिहासाची पुनः स्मृती जागवणारी आणि शौर्य, त्याग व पराक्रमाच्या अविस्मरणीय वाटेने प्रेरणादायी ठरलेली पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी तसेच NCC छात्रांनी अत्यंत उत्साहात आणि शिस्तीने पूर्ण केली. ही मोहीम म्हणजे केवळ भटकंती नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यगाथेला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला आदरांजलीचा प्रवास होता.
पहाटे पन्हाळ्यापासून सुरू झालेला प्रेरणादायी प्रवास
पहाटेच ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरून मोहिमेची सुरुवात झाली. दाट जंगलातील वाटा, कठीण चढ-उतारांनी भरलेले डोंगररांगा, मातीचा सुगंध आणि इतिहासाचा स्पर्श—या सर्वांचा अद्भुत संगम अनुभवत विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक मार्ग निर्धाराने पार केला.
सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्येक टप्प्यावर शिस्त, धैर्य आणि टीमस्पिरिटचे उत्तम उदाहरण सादर केले.
पावनखिंडेत शौर्याला साजरी अभिवादनाची सलामी
पावनखिंड येथे पोहोचताच वातावरण भारावून गेले. बाजीप्रभू देशपांडे व बांदल मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण सर्वांच्या मनात दरवळली. सर्व NCC छात्रांनी व विद्यार्थ्यांनी वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत एक मिनिट मौन पाळले—ही क्षणचित्रे खऱ्या अर्थाने इतिहासाला वंदन करणारी ठरली.
सुयोग्य नियोजनामुळे मोहीम यशस्वी
या पदभ्रमंती मोहिमेचे नीटनेटके आयोजन NCC मुली विभागाच्या ANO मेजर सुनिता भोसले आणि IQAC प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांनी केले.
या मोहिमेला सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शन लाभले. प्रतिष्ठानचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज, अध्यक्ष हेमंत साळोखे तसेच सदस्य शुभम कोळी, प्रवीण केंबळे, योगेश वेटोळे, पार्थ जाधव, केतन कांबळे, राजवर्धन आडनाईक, अखिलेश गुरव यांचे मोलाचे सहकार्य मोहिमेच्या यशामागील बळ ठरले.
महाविद्यालय प्रशासनाचा सक्रिय सहभाग
या उपक्रमासाठी विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.पी. थोरात,
6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे,
तसेच प्रबंधक श्री. एस.के. धनवडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले.

