
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
पहाटेची वेळ, साधारण पहाटे ५.४५. थंडीची तीव्रता चहुबाजूंनी जाणवत असताना, नवीन शिवाजी पुलावर पाहायला मिळालेले चित्र मन सुन्न करणारे होते. पुलाच्या मध्यभागी दोन रस्त्यांच्या जॉइंटमध्ये पडलेली मोठी भेग… आणि त्या भेगेत एका मूक घोड्याचा पाय घट्ट अडकलेला.
पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी हे दृश्य पाहताच धाव घेतली. अनेकांनी मिळून घोड्याचा पाय बाहेर काढण्याचा जीवापाड प्रयत्न सुरू केला. पण लोखंडी जॉइंटच्या अरुंद जागेत पाय इतका घट्ट अडकला होता की सरकणे तर दूरच, हलणेसुद्धा शक्य नव्हते.
कोणीतरी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. फायरब्रिगेडचे जवान पोहोचले, औजारांनी, लीव्हरनी, तंत्राने… सर्वांनी मिळून घोड्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मिनिटागणिक वाढणारी थंडी, थरथरणारा घोडा, वेदनेने होणारी त्याची धडपड, आणि आजूबाजूला उभे असलेले असहाय नागरिक — सर्वच दृश्य असह्य करून गेले.
भरपूर वेळ प्रयत्न करूनही पाय सुटत नव्हता. लोकांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढतच होती. प्राण्याच्या वेदनेचे नि:शब्द आक्रोश थेट हृदयाला भिडत होता. असे संकट कोणत्याही प्राण्यालाच नव्हे तर एखाद्या छोट्या मुलालाही, सायकलस्वारालाही, वृद्धालाही येऊ शकते… ही जाणीव प्रत्येकाला टोचत होती.

या पुलावरील मोठी, उघडी भेग कित्येक दिवसांपासून धोकादायक आहे, याची माहिती स्थानिक नागरिकांकडून सतत मिळत आहे. परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे केलेले दुर्लक्ष आता जीवघेणे ठरत आहे. आज मूक जनावर अडकले… उद्या कुणा माणसाचा जीव धोक्यात आला तर?
आजच्या या घटनेने प्रशासनाला जाग येईल का?
रस्त्यांवरील भेगा बुजवण्यासाठी, जॉइंट सुरक्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील का?
कडक थंडीत वेदनेने तडफडणाऱ्या त्या बिचाऱ्या घोड्याचे दृश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणण्याइतके हृदय पिळवटून टाकणारे होते.
नागरिकांचा प्रश्न एकच — “प्रशासनाने अजून किती जीवितहानीची वाट पाहायची?”

