छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट – जयंत पाटील

0
91

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : ‘एक देश एक निवडणुका’ या केंद्र सरकारच्या धोरणातून प्रादेशिक आणि छोटे पक्ष संपविण्याचा मोदी सरकारचा कट आहे. 

त्यामुळे हे केंद्रातील सरकार उलथून टाकण्यासाठी प्रागतिक पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेत असून त्याला साथ द्या, असे आवाहन शेकापचे राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी केले.

कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉल येथे प्रागतिक पक्षांच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेकापचे माजी आमदार संपतराव पवार होते.

स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील म्हणाले, दोन वर्षांपूर्वीच आम्ही १३ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या एकत्रित प्रागतिक पक्षाची स्थापना केली आहे.

राजकीय पक्षांचा विचार आणि बांधिलकीशी बांधील असलेल्या भूमिकेवरून इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला असला तरी ही तिसरी आघाडी नाही. ‘भाजप हटाव, मोदी हटाव’ या समान भूमिकेसाठी सर्व जण एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात प्रादेशिक आणि छोट्या पक्षांची मदत सत्तास्थापनेत घ्यावीच लागेल; परंतु, भाजपसारखा पक्ष सत्तेत येणार नाही, याची काळजी घेऊ.

राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीतही छोट्या पक्षांचा समावेश होता. पण, चळवळीतील नेत्यांकडे दुर्लक्ष झाले. म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रागतिक पक्षांची गरज निर्माण झाली आहे. 

 काळाच्या ओघात नष्ट झालेल्या चळवळीतील अनेक नेत्यांना इतर राजकीय पक्षांनी वाचवले असते तर हे लोकशाहीचे धिंडवडे निघाले नसते. यापुढे तरी चळवळी टिकल्या पाहिजेत त्यासाठी सहकार्य करा.

इंडियाची भूमिकाही एनडीएसारखीच असेल तर ते प्रागतिक पक्षांना चालणार का? यावर विचार करून पाठिंब्याचा निर्णय घ्यावा, असेही शेट्टी यांनी सूचित केले.

संपतराव पवार म्हणाले, प्रागतिक पक्ष हा समविचारी राजकीय पक्षांना बांधून ठेवणारा पक्ष आहे. याचा समुद्र होईल, तो खवळल्यानंतर देशाचे चित्र बदलेल. प्रारंभी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले.

बाबासाहेब देवकर यांनी स्वागत केले. गिरीश फोंडे यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुभाष जाधव, रेहाना शेख, माणिक अवघडे, सतीशचंद्र कांबळे, प्रा. विनाेदसिंह पाटील, रामचंद्र कांबळे, राजूू देसले, प्रताप होगाडे, डॉ. जालंदर पाटील, अतुल दिघे, संपत देसाई, उदय नारकर यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव पाटील यांनी आभार मानले. संभाजी जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

पक्ष छोटे, पण विचाराने पक्के

प्रागतिक पक्षांकडून राजू शेट्टी आणि मी इंडियाच्या बैठकीत सहभागी झालो होतो. राहुल गांधी यांनी आवर्जून आमची भेट घेतली. आमचे पक्ष छोटे आहेत, असे त्यांना सांगताच त्यांनी पक्ष छोटे असतील, मते कमी असतील परंतु जी असतील ती पक्की असतील, विचार पक्का असेल, असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेेमुळे आम्ही भारावून गेलो, असे शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

मराठ्यांना आरक्षण मिळण्याचा अधिकार

सरकार खरेदी करो अथवा ना करो, किमान हमीभावाचा कायदा संसदेत मंजूर होण्याची गरज आहे, असे राजू शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले, बहुतांश मराठे शेती करणारे आहेत, ते नोकऱ्यांपासून वंचित आहेत, म्हणून त्यांना आरक्षण मिळण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. जालन्यातील लाठीमार हा मूळ विषयांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी होता, असेही ते म्हणाले.

आरक्षण आणि काँग्रेस


ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या स्थितीला काँग्रेसही दोषी आहे. आता इंडियासोबत आमची आघाडी असल्यामुळे याविषयी हळुवारपणे बोलतो, असे जयंत पाटील म्हणाले. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची गरजच काय, विशेष अधिवेशन बोलवा आणि कायद्यात बदल करा, असे ते म्हणाले.

मुंबईत उद्धवच जिंकणार

मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच विजय मिळणार, खोकेवाले भविष्यात पुन्हा आमदार म्हणून दिसणार नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले.

राजू शेट्टी भावी खासदार

कोणी काही म्हणोत, पण राजू शेट्टी आज जरी माजी खासदार असले तरी ते भावी खासदारच असतील, असे सांगून जयंत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्यांना संरक्षण मिळावे, हीच भूमिका असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here