
कोल्हापूर | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीत अवमान केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात तब्बल 19 वर्षांनंतर न्यायालयाने मोठा निकाल देत तत्कालीन 56 नगरसेवकांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल आज दि. 23 डिसेंबर 2025 रोजी मे. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर (मे. गादिया साहेब) यांच्या न्यायालयाने दिला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दि. 20 फेब्रुवारी 2006 रोजी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रगीत अवमान केल्याचा आरोप ठेवत मेजर संजय शिंदे यांनी तत्कालीन 56 नगरसेवकांविरोधात मे. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी गेली 19 वर्षे सुरू होती.
या दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामध्ये फिर्यादी पक्षाकडून राष्ट्रगीत अवमान झाल्याचे आरोप ठोस पुराव्यांद्वारे सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेले युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व 56 नगरसेवकांना राष्ट्रगीत अवमान प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.

या खटल्यामध्ये 56 नगरसेवकांच्या वतीने
ॲड. हर्षा खंडेलवाल, ॲड. गजानन कोरे, ॲड. के. पी. राणे, ॲड. पी. डी. सामंत आणि ॲड. व्ही. व्ही. पाटील यांनी प्रभावीपणे काम पाहिले.
न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले. या वेळी
संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, प्रकाश पाटील, राजू आवळे, सागर चव्हाण, राजू कसबेकर, रफिक मुल्ला, अशोक जाधव, तुकाराम तेरदाळकर, विजय साळोखे सरदार, सतीश घोरपडे, ईश्वर परमार, संभाजी देवणे, संजय चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर व समर्थक उपस्थित होते.
तब्बल 19 वर्षे चाललेल्या या प्रकरणाचा शेवट आज न्यायालयाच्या निकालाने झाला असून, निर्दोष मुक्तता झाल्यामुळे संबंधित माजी नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

