
क्षयरुग्णांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी :जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. २३ : कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किटची मदत देणाऱ्या अभियानामध्ये डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय अहवालानुसार २०१३ क्षयरुग्णांना पोषण आहार किट पुरवून ‘कोल्हापूर ग्रामीण’ प्रथम क्रमांकावर आला आहे.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
डॉ. हर्षला वेदक यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानास मदत करणाऱ्या सर्व ‘निक्षय मित्र’, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सन २०२५ मध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार किटच्या सहाय्याने मदत करणाऱ्या प्रमुख ‘निक्षय मित्र’ संस्थांमध्ये इंडोकाउंट फाउंडेशन, गोकुळ शिरगाव यांनी ७८०० किट, घाटगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड, उचगाव यांनी ५०० किट, आणि लक्ष्मी पंप्स प्रा. लि. यांनी ७५० किट पुरवून या अभियानास मोलाचे सहकार्य केले आहे.
विशेष म्हणजे, कोल्हापुरातील ‘जाणीव फाउंडेशन’मार्फत श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज फेसबुक लाईव्हवर सादर केल्या जाणाऱ्या “निक्षय गीत मैफिली”च्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून ७८ पोषण आहार किटचे सहाय्य क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आले आहे. हा देशातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.
जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती (टी.बी. फोरम) च्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मा. अधिष्ठाता, रा.छ.शा.म.शा. वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांचे डॉ. सदानंद भिसे यांनी सी.पी.आर. रुग्णालयातील एका क्षयरुग्णास दत्तक घेतले आहे. पुढे या महाविद्यालयातील अधिकारी व डॉक्टर्सही सी.पी.आर. रुग्णालयात निदान झालेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार किट दत्तक घेऊन सहाय्य करतील.
मा. राष्ट्रपती यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी “पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान” सुरू केले आहे. या अभियानाचा उद्देश असा आहे की समाजातील विविध घटकांनी (व्यक्ती/संस्था) पुढे येऊन संमती दिलेल्या क्षयरुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहाराचे सहाय्य करावे आणि क्षयमुक्त भारत निर्मितीत योगदान द्यावे.
या अनुषंगाने सर्व दानशूर व्यक्ती व संस्था यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी “निक्षय मित्र” म्हणून पुढे येऊन क्षयरुग्णांना व त्यांच्या घरातील सदस्यांना पोषण आहारासाठी किमान सहा महिन्यांसाठी “फुड बास्केट” स्वरूपात मदत करावी, जेणेकरून क्षयमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीत सर्वांचा मोलाचा हातभार लागेल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
एका फुड बास्केट किटसाठी प्रति रुग्ण अंदाजे रुपये ७०० इतका खर्च अपेक्षित आहे. (सहा महिन्यांसाठी सुमारे रुपये ४२०० इतका खर्च अपेक्षित आहे.) या माध्यमातून क्षयरुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहार किटची मदत करण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी, कोल्हापूर यांच्या कार्यालयाशी किंवा सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निक्षय मित्र – प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान थोडक्यात
क्षयरोगामुळे रुग्णांच्या वार्षिक उत्पन्नात वीस ते तीस टक्के घट होते, तर मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या पुढील पंधरा वर्षांच्या उत्पन्नात मोठी कमी होते. त्यामुळे शासनाने ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम’ राबवून मोफत निदान, उपचार आणि दरमहा रुपये १००० इतकी पोषण सहाय्याची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली आहे. उपचार कालावधीत औषधांसोबत पुरेसा पोषण आहार मिळणे आवश्यक असते. त्यामुळे रुग्ण नियमित औषधोपचार घेतो आणि पूर्ण बरा होतो. या पार्श्वभूमीवर “निक्षय मित्र” या उपक्रमाद्वारे सामाजिक संस्थांना व दात्यांना पुढे येऊन क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण आहार किटच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

