
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता. पन्हाळा) येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करताना सचिव शिवाजीराव पाटील, नॅक समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण, ज्युनिअर विभाग प्रमुख डॉ. उषा पवार व इतर मान्यवर.
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली (ता. पन्हाळा) येथे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून अत्यंत उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे व भित्तीपत्रकाचे पूजन महाविद्यालयाचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅक समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण हे होते.राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने सायन्स व गणित विभागातील विद्यार्थ्यांनी विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व माहितीपूर्ण भित्तीपत्रके सादर केली. या भित्तीपत्रकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गणितातील सिद्धांत, दैनंदिन जीवनातील गणिताचा उपयोग तसेच आधुनिक विज्ञानाशी असलेला गणिताचा संबंध प्रभावीपणे मांडला.गणित विभाग प्रमुख प्रा. उत्तम पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रीनिवास रामानुजन यांचे गणित क्षेत्रातील अमूल्य योगदान स्पष्ट करताना गणित व इतर विषयांमधील परस्परसंबंध उलगडून दाखवला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणिताकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे व संशोधनात्मक विचार विकसित करण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्या डॉ. उषा पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रविंद्र चौगुले यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश लव्हटे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रा. सुधीर पाटील, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. स्मिता कुंभार, प्रा. शरदचंद्रिका लिगाडे, प्रा. सुजाता पाटील तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची आवड, जिज्ञासा व सर्जनशीलता वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले.

