अंकली–चोकाक दरम्यानच्या महामार्गासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदलाआमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश; ७६ कोटींचा अतिरिक्त लाभ

0
19

जयसिंगपूर : प्रतिनिधी- रोहित डवरी

रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. अंकली ते चोकाक या सुमारे ३३ किलोमीटरच्या टप्प्यात बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने शेतकऱ्यांची दीर्घकालीन आणि रास्त मागणी पूर्ण झाली आहे.

रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी तसेच इतर मालमत्ता बाधित झाली होती. महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला असताना, अंकली ते चोकाक या टप्प्यातील शेतकऱ्यांना मात्र केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने करत महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकणंगलेतील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय असल्याचे त्यांनी ठामपणे निदर्शनास आणून दिले आणि शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची मागणी केली.

आमदार यड्रावकर यांच्या प्रयत्नांना यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत अखेर अंकली ते चोकाक या ३३ किमी टप्प्यासाठी चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शेतीच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे.

७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ

या टप्प्यात एकूण ९३७ खातेदार शेतकरी असून, दुप्पट दराने केवळ ९४ कोटी रुपयांची भरपाई मिळणार होती. मात्र चौपट दरास मंजुरी मिळाल्याने आता शेतकऱ्यांना एकूण सुमारे १७१ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ होणार आहे.

या निर्णयाबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here