
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सात वर्षांची कुमारी साक्षी सनी कांबळे हिच्या आयुष्यात पुन्हा एकदा उजेड आला आहे. जन्मजात मधुमेहाचा त्रास असूनही तिच्या डाव्या डोळ्यावरील मोतीबिंदूची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया उघमनगर येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली.
साक्षीला जन्मापासूनच मधुमेह असून दिवसातून दोन वेळा इन्सुलिन द्यावे लागते .सेटिंग काम करणारे तिचे वडील आणि घरकाम करणारी आई हे सरावाने ही जबाबदारी पार पाडत असतात. मधुमेह असल्याने शस्त्रक्रिया करणे हे मोठे आहवान होते. चैतन्य आय केअर फाउंडेशन – घरपण च्या अद्ययावत फिरत्या नेत्रतपासणी उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तपासणी सुरू असताना, सुमारे अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या तपासणीत साक्षीला मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले.

मधुमेह नियंत्रणात असतानाच शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने वालावलकर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी, नेत्रतज्ञ डॉ. वीरेंद्र वणकुद्रे व त्यांच्या संपूर्ण टीमने सखोल चर्चा करून योग्य नियोजन केले. साक्षीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता,संतोष कुलकर्णी यांच्या समन्वयाने मनिषा
रोटे सिस्टर्स यांच्या समावेत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एकंब फाउंडेशन मुंबई यांचे ही यासाठी भरीव योगदान लाभले आहे . दुसऱ्या दिवशी डोळ्यावरील पट्टी काढल्यानंतर साक्षीला सुमारे पाच फूट अंतर स्पष्ट दिसू लागले. हे दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंदाने संपूर्ण वैद्यकीय पथकाला आपल्या कष्टांचे चीज झाल्याची जाणीव करून दिली.

दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घातल्यानंतर फळ्यावरचे नीट दिसत नाही, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा मोठ्या वाहनांच्या दिव्यांचा त्रास होतो अशा तक्रारी केल्यास तात्काळ नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहन वालावालकर हॉस्पिटल व चैतन्य आय केअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे लहान मुलांतील डोळ्यांचे आजार वेळीच लक्षात घेऊन त्यांच्यावर योग्य वेळी उपचार झाल्यास आगामी काळात त्यांची ही समस्या मोठ्या प्रमाणात आवाक्यात येवू शकते .

