
कोल्हापूर / प्रतिनिधी : जानवी घोगळे
राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अंतर्गत भरारी पथक क्रमांक १, कोल्हापूर यांनी हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे बनावट देशी मद्याचे मोठे रॅकेट उघडकीस आणत सुमारे २५ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य मुंबईचे डॉ.राजेश देशमुख,सहआयुक्त प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यावर कडक कारवाईचे आदेश दिले होते.त्या अनुषंगाने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीमती स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा भरारी पथक क्रमांक एकने रेंदाळ येथील गारवा हॉटेलच्या मागे असलेल्या पत्र्याच्या बंदिस्त जागेवर छापा टाकला.या ठिकाणी जुन्या देशी मद्याच्या साठ्यात पाणी व मध्यार्क मिसळून तसेच नवीन देशी मद्याची भेसळ करून अधिक दराने विक्री केली जात असल्याचे आढळून आले.छाप्यात २६४ बॉक्स देशी मद्य, १६५ बल्क लिटर मध्यार्क,१५ लिटर तयार मद्य,रिकाम्या बाटल्या,बॉक्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले.तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी टोयोटा वेटोस (MH 09 FG 3535) व महिंद्रा एक्सयूव्ही (MH 09 DA 9419) ही दोन वाहनेही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी हुपरी येथील वसंत धनाजीराव पाटील (वय ५२),अरुण भाऊ बुरुंगले (वय ३२) व आमिर सज्जन शिकलगार (वय ४५) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपासात दोन देशी दारू दुकानांवरही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.अवैध मद्यनिर्मिती,वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोलफ्री किंवा व्हॉट्सअॅप क्रमांका वर संपर्क साधावा,असे आवाहन अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केले आहे.

