रत्नागिरी – नागपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई; आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या पाठपुराव्याला यश

0
14

शिरोळ / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या चोकाक ते अंकली या टप्प्यातील कामामुळे बाधित झालेल्या शेतजमीनधारकांना आता चौपट नुकसान भरपाई मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून,या निर्णयामागे हातकणंगले तालुक्याचे आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.महामार्गाच्या कामासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनींसाठी यापूर्वी शासनाकडून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र वाढती महागाई,शेतीवरील अवलंबित्व आणि भविष्यातील उत्पन्नाचा विचार करता ही भरपाई अपुरी असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले होते.त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.अशोकराव माने यांनी बाधित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाकडे भरपाई चौपट करण्याची मागणी लावून धरली.डॉ.माने यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.तसेच वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विषयाचा पाठपुरावा केला. महामार्गामुळे विकास होणार असला तरी त्याची झळ शेतकऱ्यांना बसू नये,या भूमिकेतून त्यांनी ठाम भूमिका मांडली. अखेर या प्रयत्नांचे फलित म्हणून महाराष्ट्र शासनाने बाधित शेतजमीनधारकांना चौपट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला.या निर्णयाचे स्वागत करताना आमदार डॉ.अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे आभार मानले आहेत.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आपले नेते माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकार यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काची दखल घेणारा असून, विकासासोबतच शेतकऱ्यांचे हित जपणारा असल्याची भावना स्थानिक शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या कामाला आता शेतकऱ्यांच्या सहकार्याने गती मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here