
कोतोली प्रतिनिधी
कोतोली फाटा ते नांदारी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारीचे काम अर्धवट ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात होते. ठिकठिकाणी गटारी अपूर्ण असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत दैनिक पुढारीमध्ये बेधडक छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच अखेर बांधकाम विभागाला जाग आली आणि तात्काळ कामास सुरुवात करण्यात आली.
या प्रकरणी लहुजी युवा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण तात्या तांदळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून जाब विचारला. चर्चा होताच कामाला सुरुवात झाल्याने प्रशासन फक्त दबावाखालीच काम करते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी अर्धवट कामे आम्ही खपवून घेणार नाही. पुढारीने आवाज उठवला आणि आम्ही प्रशासनाला थेट जाब विचारला, म्हणूनच काम सुरू झाले. लोकप्रतिनिधी गप्प बसले, पण जनता आणि सामाजिक कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.”
यावेळी निवडे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे व बाजीराव कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, जनतेच्या प्रश्नांवर बोलणे अपेक्षित असलेले विद्यमान खासदार मात्र या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगत असल्याची तीव्र चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, नणुंद्रे येथील अर्धवट राहिलेल्या गटारीच्या कामाबाबतही लक्ष्मण तांदळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित विभागाने हे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने प्रवासी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते शैलेश हिर्डेकर यांनीही ठाम भूमिका घेत प्रशासनावर टीका केली.
कोट
“वृत्तपत्रात बातमी आली, आंदोलनाचा इशारा मिळाला, तेव्हाच प्रशासन हलले. हे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधी शांत आहेत, पण आम्ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही.”
लक्ष्मण (तात्या) तांदळे
या पाठपुराव्यात संभाजी ब्रिगेड पन्हाळा तालुकाध्यक्ष शैलेश हिर्डेकर,उपाध्यक्ष स्वानंद पाटील, संघटक शरद जोतीराम मोरे व कार्याध्यक्ष सुरज बंडोपंत पाटील यांचेही मोलाचे योगदान लाभले.
जनतेच्या दबावामुळे आणि एसपी न्युज पत्रकारितेमुळेच रखडलेली कामे मार्गी लागली असून, पुढेही अर्धवट कामांवर संघर्ष अटळ आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

