
कोतोली | प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
आजची तरुण पिढी विविध विकार, व्यसन आणि दिशाहीन जीवनशैलीच्या विळख्यात अडकत चालली असताना, या अंधारात प्रकाशाची वाट दाखविण्याचे पवित्र कार्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, कोतोली यांच्या वतीने अखंडपणे सुरू आहे.
गेले वर्षभर प्रत्येक एकादशीला मंदिरात आयोजित केले जाणारे प्रवचन, कीर्तन व नामस्मरण सोहळे हे केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता तरुणाईच्या जीवनात सात्विक विचारांचे बीज रोवणारे संस्कारपीठ ठरत आहेत.
या उपक्रमाला गावातील तसेच परिसरातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, ही बाब निश्चितच आशादायक आणि समाजासाठी दिलासादायक आहे.
आज मंगळवार, ३१ डिसेंबर — पवित्र भागवत पुत्रदा एकादशी.
ज्या दिवशी अनेक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत अश्लील गाण्यांवर नाचून नववर्षाचे स्वागत केले जाते, त्या दिवशी कोतोलीत मात्र आपल्या हिंदू संस्कृतीचा, संयमाचा आणि अध्यात्माचा जागर घातला जात आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
गुढी पाडव्यालाच खरे नववर्ष मानणारी आपली संस्कृती मद्य, उन्माद आणि उथळ आनंदाला कधीही मान्यता देत नाही. म्हणूनच, या पावन दिवशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला नामस्मरणातून आत्मशुद्धी आणि संस्कारांची नव्याने सुरुवात करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ७ वाजता, कोतोली येथील श्री विठ्ठल मंदिरात
ह. भ. प. विष्णुपंत सुतार (गुरुजी) महाराज, दोनवडे यांच्या सुश्राव्य व हृदयस्पर्शी प्रवचनाचा तसेच सामूहिक नामस्मरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
“आपली संस्कृती, आपला धर्म — आपणच जगायचा असतो”
हा संदेश घेऊन हा सोहळा प्रत्येक कुटुंबाला अंतर्मुख करणारा ठरणार आहे.
तरुणांनी, पालकांनी आणि संपूर्ण परिवाराने या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून अध्यात्मिक समाधानाचा व संस्कारांचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
🚩 जय जय राम कृष्ण हरि 🚩
— संस्कृती जपुया, संस्कार रुजवूया… 🙏

