
कोतोली प्रतिनिधी: पांडुरंग फिरींगे
गेली तीन दशके पडून असलेल्या कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन अखेर दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या निर्लेखनामुळे गावातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त झाले असून, आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.
या निर्लेखनासाठी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी श्री. प्रकाश खंडू कांबळे यांनी शासन दरबारी सातत्याने दोन वर्षे पाठपुरावा व संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांना श्री. अभिजीत कोतोलीकर व प्रा. अविनाश कोतोलीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने आज हे यश शक्य झाले.
निर्लेखनप्रसंगी पन्हाळा पंचायत समिती अंतर्गत पन्हाळा आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. गायकवाड, कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. जयदीप रेवडेकर व त्यांची टीम उपस्थित होती. तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. रायसिंग वळवी, ग्रामपंचायत सदस्य श्री. अजित प्रकाश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सदर निर्लेखनाची लिलाव प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे पार पडली. शासकीय पातळीवर श्री. बाजीराव दाभाडे व श्री. संदेश दाभाडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
लिलावप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण निर्लेखन व लिलाव प्रक्रिया खेळीमेळीच्या व समाधानकारक वातावरणात पार पडली. यासाठी गावातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
ही कारवाई कोतोली गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानली जात असून, भविष्यात येथे नव्या विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

