
कोतोली प्रतिनिधी -पांडुरंग फिरींगे
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळ्याचे भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले होते. या पारायण सोहळ्यास परिसरातील सुमारे अडीचशे भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली.
सकाळपासूनच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारायणानंतर उपस्थित भाविकांना संस्थेचे विश्वस्त अजित नरके यांच्या हस्ते फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.
वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व सहभागी स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून रंगीबेरंगी आणि आकर्षक रांगोळ्यांची साकारणा करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
या प्रसंगी मुख्याध्यापक सुरेश लोहार, युवा नेते अरुण सावंत यांच्यासह संस्थेचे शिक्षकवृंद, कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी जनता शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा गौरव केला.
संस्थेच्या ६६ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा साक्षीदार ठरलेला हा सोहळा भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरला.

