
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर येथील सायबर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्यात, “माजी विद्यार्थी हेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे खरे प्रचारक असतात” असे प्रतिपादन मनोरमा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापिका व प्रमुख पाहुण्या श्रीमती अश्विनी दानीगोंड यांनी केले. आपल्या कार्यातून, आचारातून आणि समाजातील योगदानातून माजी विद्यार्थी आपल्या शिक्षणसंस्थेची ओळख निर्माण करतात, त्यामुळे संस्थेची सामाजिक प्रतिमा अधिक भक्कम होते, असेही त्यांनी नमूद केले.
सायबर महाविद्यालयाच्या ५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीतून घडलेले असंख्य विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत, ही बाब कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्याच्या सुरुवातीस सायबर महाविद्यालयाचे संस्थापक कै. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या समन्वयक डॉ. रजनी कामत यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक प्रवास, बदलत्या काळानुसार घेतलेली वाटचाल आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत संस्थेचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी सायबर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व डेहराडून येथील आयएमएस युनिसन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिल सुब्बाराव पैला यांनी, आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासात सायबर महाविद्यालयाने दिलेल्या भक्कम पायाभरणीचा उल्लेख करत, कुलगुरूपर्यंत पोहोचण्यात संस्थेचे मोठे योगदान असल्याचे नम्रपणे सांगितले.

ऑस्ट्रेलियात सायबर सिक्युरिटी क्षेत्रात कार्यरत असलेले आशुतोष कापसे यांनी, त्या काळात सायबर महाविद्यालयाने संगणक शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार सुविधा आणि मार्गदर्शनामुळेच आपला आजवरचा यशस्वी प्रवास शक्य झाला, असे आवर्जून नमूद केले. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय कंपनीत मानव संसाधन प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. बालाजी एम. एस. यांनी, महाविद्यालयातील तत्कालीन प्राध्यापकांनी दिलेले संस्कार आणि मूल्यशिक्षण जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्यास उपयुक्त ठरल्याचे सांगितले.
पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी, सायबर महाविद्यालयामुळेच व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत, त्या ज्ञानाचा उपयोग पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी करत असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. स्नेह नागावकर यांनी केले, तर डॉ. दुर्गेश वळवी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. शिंदे आणि सचिव सीए ऋषिकेश शिंदे यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. तसेच संस्थेचे माजी संचालक *डॉ. पी. एस. राव, डॉ. एम. एम. अली, डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, निवृत्त प्राध्यापक *डॉ. ए. आर. कुलकर्णी, डॉ. एस. व्ही. शिरोळ, डॉ. पी. बी. पाटील, डॉ. आर. ए. दर्प, डॉ. राजेंद्र पारिजात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यास देश-विदेशातील विविध भागांतून सुमारे पाचशेहून अधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या निमित्ताने प्रसिद्ध बासरीवादक डॉ. सचिन जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली मधुर गीतांची मैफिल उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी सायबर महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळाव्याने जुन्या आठवणींना उजाळा देतानाच, सायबर महाविद्यालय आणि त्याच्या विद्यार्थ्यांमधील दृढ नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले.








