
कोल्हापूर | प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप जाहीर होताच सत्ताधारी युतीत नाराजीनाट्य उफाळून आले आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत भाजप कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महायुतीतील अंतर्गत चर्चांनंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात प्रभागनिहाय जागावाटप अंतिम करण्यात आले. मात्र या प्रक्रियेत अनेक इच्छुक आणि काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यातून असंतोष उफाळून येत आहे.
भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि संघटनात्मक कामात पुढाकार घेणाऱ्या धनश्री तोडकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या आहेत. पक्षासाठी केलेल्या प्रदीर्घ कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भाजप कार्यालयासमोर पत्रकारांशी बोलताना तोडकर म्हणाल्या,
“मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र बाहेरून आलेल्या आणि पक्षाशी फारसा संबंध नसलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली. हे अन्यायकारक आहे. माझ्या मागणीकडे लक्ष न दिल्यास टोकाचे पाऊल उचलावे लागेल.”
या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे पोलिस व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजप कार्यालय परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपामुळे केवळ भाजपच नव्हे तर इतर घटक पक्षांमध्येही नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची बंडखोरी, अपक्ष लढण्याची तयारी आणि उघड नाराजी यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या प्रकारामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची अंतर्गत एकजूट कितपत टिकून राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

