
कोतोली प्रतिनिधी -पांडुरंग फिरींगे
श्रीपतराव चौगुले कॉलेज, कोतोली येथील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे येथे क्षेत्रकार्य भेटीचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक समाजरचना, कामगारांचे जीवनमान तसेच कारखान्याची प्रत्यक्ष कार्यपद्धती समजून घेण्याचा होता.
भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना साखर उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. उसाच्या प्रक्रिया पासून साखर निर्मितीपर्यंतची प्रत्येक टप्प्यांची माहिती अधिकाऱ्यांनी सविस्तरपणे दिली. यासोबतच कारखान्यात कार्यरत असलेल्या कामगारांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, त्यांचे कामाचे स्वरूप व औद्योगिक जीवनातील आव्हाने याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या प्रसंगी कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री. धीरज माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “साखर निर्मितीची प्रक्रिया समजली का?”, “कामगारांच्या जीवनाविषयी तुम्हाला कोणती निरीक्षणे नोंदविता आली?” अशा प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्तीला चालना दिली. विद्यार्थ्यांनीही आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करत या भेटीमुळे अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या क्षेत्रकार्य भेटीसाठी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुरलीकर तसेच प्रा. दत्तात्रय नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. समाजशास्त्र विभागाचे एकूण २६ विद्यार्थी या अभ्यासभेटीत सहभागी झाले होते. ही भेट विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
फोटो ओळ : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना येथे श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यवस्थापकीय संचालक मा. धीरज माने, समवेत डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. दत्तात्रय नाईक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

