
कोतोली | प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुजल टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक मा. संजय पाटील यांनी केले.
येथील नेहरू विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या अंतर्गत असलेल्या संगीतकाराला चालना मिळावी या उद्देशाने शाळेस पियानो भेट दिला.
पियानो भेट प्रसंगी बोलताना मा. संजय पाटील म्हणाले, “नेहरू विद्यामंदिर ही केवळ शैक्षणिक गुणवत्ता जपणारी संस्था नसून कला, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा आहे. या शाळेतून भविष्यात गुणवंत विद्यार्थी घडावेतच, पण त्याचबरोबर उत्कृष्ट संगीतकार, कलाकार व संवेदनशील व्यक्तिमत्त्वे घडावीत, हीच अपेक्षा आहे.”
भेटवस्तूचा स्वीकार मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश लोहार यांनी करत माननीय संजय पाटील यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कलात्मक उपक्रमांची गरज असून ही भेट निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास सुभाष लव्हटे, चेतन जाधव, अरुण सावंत, युवराज पाटील, दीपक पाटील, सागर कांबळे, गणेश काटकर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

