
प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
शांतिनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विश्वविक्रमवीर व ग्लोबल ब्रँड अँबेसिडर भारत विभूषण प्रा. डॉ. अनुप्रिया गावडे हिने राष्ट्रीय स्तरावर आयोजित रामानुजन गणित चॅलेंज परीक्षेत देशात चौथा क्रमांक पटकावत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, तिने सलग चौथ्यांदा ऑल इंडिया रँक मिळवून आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.भारतीय संविधान व बालहक्क कायदा तोंडपाठ असलेल्या अनुप्रिया गावडे हिच्या नावावर पाच विश्वविक्रम नोंदविले गेले आहेत. ती अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची संविधान व बालहक्क कायद्याबाबत जनजागृती करणारी अँबेसिडर म्हणून सक्रियपणे कार्यरत आहे. आजपर्यंत तिने आठ हजारांहून अधिक नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागृती निर्माण केली आहे.अभ्यासासोबतच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनुप्रियाने आतापर्यंत ९० हून अधिक सुवर्णपदके आणि ६० पेक्षा अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व प्रादेशिक पुरस्कार पटकावले आहेत. क्रीडा क्षेत्रातही तिची कामगिरी उल्लेखनीय असून कला, क्रीडा व अभ्यास या सर्व क्षेत्रांत तिने आपल्या बुद्धिमत्तेची झलक दाखवली आहे.लहानपणापासूनच उपजत वक्तृत्व कौशल्य लाभलेल्या अनुप्रियाने शालेय स्तरावर अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ‘भारताची सुपर स्पीकर’ होण्याचा मानही मिळाला आहे. ब्रिलियंट अकॅडमीच्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक, तर व्हिझक्लब कार्निवल आयोजित ऑल इंडिया किड्स प्रीमियर लीग (मास्टर ऑरेटर) स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तिच्या या बहुआयामी कामगिरीची दखल घेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांनी तिची यशोगाथा प्रसिद्ध केली आहे. अनुप्रियाला शाळेच्या संचालिका सौ. राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव तसेच सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ती प्रसिद्ध सनदी लेखापाल श्री. अमित गावडे आणि नाइट कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. अक्षता गावडे यांची कन्या आहे.अनुप्रिया गावडे हिच्या या उज्ज्वल यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

