
प्रतिनिधी : जानवी घोगळे
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत कॉ. दत्ता देशमुख अभ्यासकेंद्र, कॉलेज ऑफ नॉन कॉन्वेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन (CNCVCW), कोल्हापूर आणि नेहरू स्टडी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पी. एम. उषा अंतर्गत “भारतातील सामाजिक बदल” या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा आज, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी १०.०० वाजता माननीय डॉ. अभय टिळक (अध्यक्ष, संत तुकाराम महाराज अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा. डॉ. प्रकाश पवार (प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि डॉ. वी. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या हस्ते झाले.प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडत सामाजिक बदल हा महोत्सवाच्या स्वरूपात साजरा होण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर. जी. कुलकर्णी, मुख्याध्यापक, CNCVCW होते.पहिल्या सत्रात माननीय डॉ. अभय टिळक यांनी “भक्ती चळवळ : धर्म आणि अध्यात्म” या विषयावर मार्गदर्शन करत अध्यात्मिक बदल व सामाजिक सुधारणांवर प्रकाश टाकला. त्यांनी महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे तसेच डॉ. रामकृष्ण गोपाळ यांच्या विचारांचे संदर्भ दिले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. वी. एन. शिंदे यांनी चांगला नागरिक होणे हेच खऱ्या अर्थाने धर्माचे पालन असल्याचे नमूद करत सामाजिक बदल, नैतिकता आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.दुसऱ्या सत्रात (सकाळी ११ ते १२) ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी “विसाव्या शतकातील धर्मचिंतन” या विषयावर सखोल विवेचन केले. धर्मचिंतनाची संकल्पना, त्याचे सामाजिक महत्त्व आणि विविध उदाहरणे त्यांनी मांडली. या सत्राचे अध्यक्ष श्री श्रीरंग गायकवाड, संपादक, दैनिक ‘तरुण भारत’ होते. त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा यांसारख्या थोर संतांचे अभंग व ओव्यांचा संदर्भ देत आजच्या युगातील त्यांचे महत्त्व विशद केले.तिसऱ्या सत्रात (दुपारी १२ ते १) ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनील कुमार लवटे यांनी “हिंदी साहित्य आणि धर्मचिंतन” या विषयावर व्याख्यान दिले. हिंदी साहित्यातील संतकाव्य, भक्तिसाहित्य व आधुनिक साहित्याने समाजात नैतिकता, समता आणि मानवतावादाची मूल्ये कशी रुजवली यावर प्रकाश टाकला. या सत्राचे अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी मांडले.शेवटच्या सत्रात (दुपारी १.३० ते २.३०) सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप पाटील यांनी “सामाजिक बदल : पाणी आणि वीज कामगारांचे प्रश्न” या विषयावर आपले विचार मांडले. पाणी व वीज कामगारांच्या सुरक्षितता, कामाचे तास, वेतन आणि सामाजिक सन्मान यासंबंधी असलेल्या अडचणी अधोरेखित केल्या. अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी केले.पहिल्या सत्राचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका रितिका चंद्वानी, दुसऱ्या सत्राचे सहाय्यक प्राध्यापिका ज्योती हिरेमठ, तिसऱ्या सत्राचे अनुराधा कुंभार आणि चौथ्या सत्राचे आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका उमेमासिरा रहिमतपुरे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका सौ. अलका वाडकर यांनी कुशलतेने केले.

