
प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
उंचगाव व गडमुडशिंगी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी केवळ रात्रीच वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला असून, शेतीपंपाची वीज आठवड्याचे सातही दिवस दिवसा देण्यात यावी, अशी ठाम व रास्त मागणी करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने करण्यात आली आहे.सध्या कडाक्याची थंडी असून, त्यातच बिबट्या, कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीत व शेतशिवारात वाढलेला वावर पाहता, शेतकरी रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून उभी पिके धोक्यात आली आहेत.याशिवाय पहाटेच्या वेळेस कडाक्याची थंडी, भटक्या कुत्र्यांचा वावर आणि अंधार यामुळे शेतीपंप सुरू करण्यासाठी बाहेर पडणे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीचा वीजपुरवठा बंद करून दिवसा वीज देणे ही अत्यंत गरजेची बाब असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले.या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. संदीप काकडे (प्रभारी उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण – हुपरी) तसेच मा. सचिन काटकर (सहाय्यक अभियंता, हुपरी) यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर विशेषाधिकार वापरून उंचगाव–गडमुडशिंगी परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी केली.यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, फेरीवाले संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्ता फराकटे, अक्षय परीट, रामराव पाटील, सुरज इंगवले, राजू राठोड, सचिन नागटिळक, प्रमोद शिंदे, अजित पाटील, केरबा माने आदी शिवसैनिक उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतीच्या रक्षणासाठी दिवसा वीजपुरवठा करणे ही काळाची गरज असून, शासन व वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

