जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखऊन राज्य रस्ते सुरक्षा अभियानास प्रारंभ

0
10

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : केंद्र शासनाच्या निर्देशानु‌सार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ हे १ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय, येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून राज्य रस्ता सुरक्षा अभियानास आज प्रारंभ केला.

या दुचाकी हेल्मेट रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.यावेळी पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी,परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आरांक्षा यादव,प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक श्री.कदम, सामाजिक रस्ता सुरक्षा संस्था पदाधिकारी श्री. रेवणकर,प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहा मोटार वाहन निरीक्षक आदी उपस्थित होते.

या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अमोल येडगे म्हणाले,रस्ता सुरक्षेसाठी व अपघात टाळण्यासाठी नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच इतरांच्या सुरक्षिततेला प्राध्यान्य द्यावे.पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता,यांनी वाहनधारकांनी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर जरूर करावा तसेच उत्कृष्ट दर्जाची म्हणजेच ISO मानांकनाची हेल्मेट्स वापरावीत असे सांगितले.

या दुचाकी रॅलीमध्ये रॉयल रायडर्स, कोल्हापुर या कल्बचे सुमारे १०० हून अधिक दुचाकी धारकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून रस्ते सुरक्षेचे प्रबोधनात्मक कार्य केले. यामध्ये रॉयल रायडर्स, कोल्हापूरचे अध्यक्ष जयदिप पवार ,सचिव अभिजीत काशीद यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. या दुचाकी रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय, येथून प्रारंभ होवून खानविलकर पेट्रोल पंप.दसरा चौक-बिंदु चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महानगरपालिका चौक-सीपीआर हॉस्पिटल व्हिनस कॉर्नर-ताराराणी चौक-प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे सांगता करण्यात आली

या कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा अभियान- २०२६ अंतर्गत १ ते ३१ जानेवारी या कालावधीत पोलीस, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता सुरक्षासंबंधी बॅनर तयार करून मुख्य रस्त्यावर महत्वाचे ठिकाणी प्रदर्शित करणे, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी रस्ता सुरक्षाविषयी व्याख्याने आयोजित करणे, रस्त्यावरील परिवहन वाहने, बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रॉली या वाहनांना परावर्तिका लावणे, वाहनचालकांकरीता नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबीरांचे आयोजन करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या प्रशिक्षकासाठी उजळणी कार्यशाळा आयोजित करणे, रस्ते अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबी या संदर्भात विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करणे, विविध प्रसारमाध्यमाव्दारे रस्ता सुरक्षा स्लोगन प्रदर्शित करणे आदी उपक्रम राबविण्यात येणारआहेत.

या कार्यक्रमासाठी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने, नंदकुमार मोरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, सार्बजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here