कोल्हापूरच्या निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांचे इस्त्रोकडे ऐतिहासिक उड्डाण

0
19

प्रतिनिधी : जानवी घोगळे

9 ते 13 जानेवारी दरम्यान बेंगलोर येथे अभ्यास दौरा

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) : अनुसूचीत जाती उपयोजनेतंर्गत ३ टक्के नाविन्यपूर्ण योजनेतून निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या बेंगलोर येथील केंद्रामध्ये अभ्यास दौरा करण्यासाठी कोल्हापूरच्या निवासी शाळेतील विद्यार्थी हे दिन ९ ते १३ जानेवारी दरम्यान बेंगलोर येथे जाणार आहेत.

जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या एकूण ४ अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलांसाठीच्या निवासी शाळा मसुद माले, ता. पन्हाळा,गगनबावडा, शिरोळ व राधानगरी येथील कार्यरत आहेत.या शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट विमानाने इस्त्रो भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या बेंगलोर येथील केंद्रास ९ ते १३ जानेवारी या दरम्यान भेट देतील. केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविला जाणार आहे. इस्त्रो सारख्या नामांकित संस्थेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व,अंतराळ संशोधनातील भारताची प्रगती आणि भविष्यातील संधी यांची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरणार आहे. या उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाची शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील प्रगती प्रती असलेली वचनबध्दता दिसून येईल. मागासवर्गीय प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या,अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये यांची काळजी शासनाने घेतली आहे.सामाजिक समानता,संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विशेष प्रयत्नातून या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इस्त्रोचा अभ्यास दौरा घडविणे हा एक ऐतिहासिक उपक्रम राबविला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here