
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक राजवटीच्या माध्यमातून महायुती सरकारने शहरावर लादलेला मनमानी, अपारदर्शक व भ्रष्ट कारभार उघड करत आमदार सतेज पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासक राजवटीचा सविस्तर पंचनामा मांडत शहराच्या दुर्दशेला थेट महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. या पत्रकार परिषदेस आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सतेज पाटील म्हणाले की, प्रशासक राजवटीच्या काळात कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदार, अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमधील टक्केवारीच्या भ्रष्ट व्यवहारामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचेही त्यांनी नमूद केले. कोल्हापूर स्वच्छ, सुंदर शहर म्हणून ओळखले जात होते; मात्र आज कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कचरा संकलन, प्रक्रिया आणि व्यवस्थापन या सर्व बाबींमध्ये अपयश आले असून, यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
महानगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा खर्च होऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, उद्याने अशा सर्वच बाबतीत प्रशासन अपयशी ठरले आहे. हा सर्व भ्रष्ट कारभार प्रशासक राजवटीमुळेच वाढला असून, लोकप्रतिनिधी नसल्याने कोणतीही लोकशाही नियंत्रण व्यवस्था उरलेली नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की, कोल्हापूर शहराची सध्याची दुर्दशा ही महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि प्रशासक राजवटीचा परिणाम आहे. त्यामुळे येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत नागरिक काँग्रेसला संधी देतील आणि काँग्रेसच भारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेस राजेश लाटकर, दौलत देसाई, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, आनंद माने, माजी महापौर वंदना बुचडे, जयश्री सोनवणे, स्वाती यवलुजे, शोभाताई बोंद्रे, हरिदास सोनवणे, भारतीताई पोवार, सरलाताई पाटील, भरत रसाळे, बाळासाहेब सरनाईक, वेदवती मोहीते यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

