
प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोल्हापूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. जयसिंगपूर येथे झालेल्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत स्वाभिमानी संघटना सातत्याने निवडणुका लढवत आली असून, आगामी निवडणुकांमध्ये या तालुक्यांबरोबरच इतर तालुक्यांमध्येही उमेदवार देण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
पन्हाळा तालुक्यातील जवळपास निम्मी गावे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात. या भागातील बहुतांश गावांमध्ये स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय असून संघटनेची मजबूत बांधणी आहे. त्यामुळेच पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
लवकरच पन्हाळा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा व रणनीती ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वाभिमानीने पन्हाळ्यात निवडणूक रिंगणात उतरल्यास राजकीय समीकरणे कशी बदलतात, किती पक्षांचे उमेदवार असतील आणि निवडणूक किती रंगतदार होईल, हे येणारा काळच ठरवेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

