शाळेच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन लंडनस्थित युवकाकडून विद्यामंदिर कांटे शाळेस आर्थिक मदत

0
12

शाहुवाडी -प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या विद्यामंदिर कांटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी लंडनमध्ये कार्यरत असलेल्या युवकाला प्रेरित करून सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घडवले आहे.
शाळेच्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास पाहून लंडनस्थित युवक किरण मधुकर सावर्डेकर (रा. म्हाळुंगे तर्फे बोरगाव) विशेषतः प्रभावित झाले. “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजेत” या सामाजिक जाणिवेतून तसेच आपले वर्गशिक्षक व गुरू आदरणीय पी. डी. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यामंदिर कांटे शाळेच्या कमानीसाठी १०,००० रुपये आर्थिक मदत दिली.
या प्रसंगी किरण सावर्डेकर यांनी लंडन येथून व्हिडिओ कॉलद्वारे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे याच दिवशी किरण सावर्डेकर यांचा वाढदिवस असल्याने विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कार्यक्रम अधिक भावनिक व प्रेरणादायी बनवला.
कार्यक्रमात ज्युनिअर विभागाचे कला विभाग प्रमुख आदरणीय पी. जे. पाटील सर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे ‘बाप’ या कवितेच्या सादरीकरणासाठी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा उपस्थित मान्यवरांनी गौरव केला. तसेच विद्यामंदिर कांटे शाळेचे माजी अध्यापक आदरणीय अनिल कांबळे सर यांचा वाढदिवसही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास डी. सी. नरके वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, किरण सावर्डेकर यांचे गुरू पी. डी. पाटील सर, प्रा. पी. जे. पाटील सर, सहाय्यक प्राध्यापक वातकर सर, सहाय्यक प्राध्यापक पोवार सर, विद्यामंदिर कांटे शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय केशवराव गुरव सर, ज्येष्ठ शिक्षक सूर्यकांत जांभळे सर, अनिल पोवार सर, रोहित चौगले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, सदस्य सुनील पाटील, सहदेव साळोखे, गावचे पोलीस पाटील जगदीश पाटील, दैनिक राष्ट्रगीतचे पत्रकार सुरज माळवी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण मधुकर सावर्डेकर यांनी प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर, म्हाळुंगे तर्फे बोरगाव येथे तर माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल, पूनाल येथे पूर्ण केले. त्यांनी तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, वारणानगर येथून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे लंडन येथे एम.एस्. (Telecommunications) व एम.एस्. (IT Management) ही उच्च शिक्षणे पूर्ण करून सध्या लंडनमधील नामांकित कंपनीत IT Senior Associate म्हणून कार्यरत आहेत.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्याला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here