
सामंजस्य करारप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर समवेत चेंबरचे कार्यकारिणी सदस्य सी.पी. ठक्कर, चेंबरचे महासचिव सुरेश घोरपडे, सदस्य राजन ठवकर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विद्यापीठ व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन.
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून घडणार उद्योजक
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवसाय व्यवस्थापन विभाग आणि ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर’ (MACCIA) यांच्यात शनिवारी, ३ जानेवारी २०२६ रोजी महत्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यापीठाच्या सभा कक्षात हा करार हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.
उद्योजकतेसाठी शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्राची युती
शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी करणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून कौशल्य विकास, नवोपक्रम (Innovation), शिक्षक क्षमता विकास, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि उद्योगांमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही संस्था एकत्रित काम करणार आहेत.
‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पना होणार साकार
याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी माहिती दिली की, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरची स्थापना, कार्य आणि भविष्यकालीन उपक्रमांबाबत माहिती दिली. प्रत्येक गावामध्ये उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टीने गाव तिथे उद्योजक, उद्योग विचार मंच यासह विविध उपक्रम महाराष्ट्र चेंबर राबवित आहे. गावागावांमध्ये उद्योगांवर चर्चा व्हावी या दृष्टीने उद्योजक विचार मंच निर्माण करण्यात आला आहे. ग्रामीण भागात उद्योजक तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. या माध्यमातून उद्योजक तयार होण्याकरिता प्रशिक्षण तसेच भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे. तसेच जागतिक स्तरावर व्यापार उद्योग वाढावा, बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबरने ६० देशांसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती दिली.
ग्रामीण भागातील महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित – कुलगुरू
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी या कराराचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, “हा करार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. प्रत्येक तालुक्यात एका महाविद्यालयाला मुख्य केंद्र (Hub) बनवून, त्याद्वारे परिसरातील इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे दिले जातील.” या उपक्रमामुळे नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या शोधात न राहता स्वतःचे उद्योग सुरू करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, चेंबरचे कार्यकारिणी सदस्य सी.पी. ठक्कर, चेंबरचे महासचिव सुरेश घोरपडे, सदस्य राजन ठवकर, तसेच कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विद्यापीठ व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

