
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
एसपी नाईन न्यूज ने “निवडेतील मनगरी नदीत पाणी दूषित” या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने तात्काळ दखल घेत पोलखोल यंत्रणा कार्यान्वित केली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांना पाणी उकळून व गार करूनच पिण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
पन्हाळा तालुक्यातील निवडे–मोरेवाडी परिसरातून वाहणाऱ्या मनगरी नदीत कुक्कुटपालन व्यवसायातील मृत कोंबड्या व त्यांची घाण टाकण्यात आल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले होते. या पाण्यामुळे जनावरे पाणी पिण्यास नकार देत असून महिलांना कपडे धुण्यासाठी गेल्यावर तीव्र दुर्गंधी जाणवत होती.
तहसीलदार माधवी शिंदे व ग्रामसेवक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची यंत्रणा राबवत कुक्कुटपालन व्यवसायीकां नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अडकलेल्या मृत कोंबड्या व घाण बाहेर काढण्यात आली. तसेच संबंधित पाण्याचे नमुने आरोग्य विभागामार्फत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून दोषी व्यक्तींची चौकशी करून अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.

घटनास्थळी लहू पाडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सर्जेराव गुरव, युवराज चव्हाण तसेच पाण्याच्या प्रवाहात उतरून मदत करणारे जलतरणपटू बंडोपंत यादव उपस्थित होते.
दरम्यान, उंड्री व बोरगाव उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी संदीप पाटील व हरीभाऊ कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की मनगरी नदीतील पाणी सध्या पिण्यासाठी वापरात नसले तरी जनावरांसाठी तसेच नदीखालील गावांमध्ये वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

कोट :
“निवडे परिसरातील काही कुक्कुटपालन व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाचा कचरा नदीत टाकल्याने पाणी दूषित झाले आहे. यापुढे असा प्रकार कोणी करताना आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
— उज्वला सुतार, सरपंच, निवडे
कोट :
“ही घटना ग्रामस्थांच्या जीवितास धोकादायक ठरू शकणारी होती. प्रशासन व आरोग्य विभागाने तत्परता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यापुढे दोषींवर कठोर कारवाई व्हावी.”
— लक्ष्मण तांदळे, अध्यक्ष, युवा लहुजी संघर्ष सेना
कोट :
“ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तरी खबरदारी म्हणून पाणी उकळून व गार करूनच पिण्यासाठी वापरावे.”
— संदीप पाटील, आरोग्य अधिकारी
सध्या मनगरी नदीतील पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोतोली निवडे येथील मनगरी नदीतील दुषित पाणी तपासणी करताना आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

