श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये पाश्चर सप्ताहा निमित्त आंबवलेल्या अन्नपदार्थांचे प्रदर्शन

0
25

कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे

आंबवलेले अन्नपदार्थ आरोग्यास अत्यंत उपयुक्त असून किण्वन प्रक्रियेमुळे त्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ होते. या सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक्स म्हणतात आणि ते पचनसंस्था सक्षम ठेवण्यास मदत करतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.श्रीपतराव चौगुले आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागामार्फत पाश्चर सप्ताहानिमित्त दि. २ जानेवारी २०२६ रोजी ‘आंबवलेल्या अन्नपदार्थांचे प्रदर्शन’ (Fermented Food Exhibition) आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील होते. तर हिंदी विभागप्रमुख डॉ. वंदना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये इडली, डोसा, ढोकळा, दही, लोणची, ब्रेड आदी आंबवलेल्या अन्नपदार्थांचे विविध नमुने सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या अन्नपदार्थांच्या किण्वन प्रक्रियेची माहिती देत त्यामध्ये कार्यरत असलेल्या सूक्ष्मजंतूंची शास्त्रीय भूमिका उपस्थितांना सविस्तरपणे समजावून सांगितली.किण्वन प्रक्रियेमधील सूक्ष्मजंतूंचे महत्त्व व त्यावरील लुई पाश्चर यांच्या योगदानाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला. दैनंदिन जीवनातील अन्ननिर्मितीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचा वापर कसा होतो, याबाबत जनजागृती करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. ए. जे. शिंगे व प्रा. पी. पी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.प्रास्ताविक व स्वागत प्रा. ए. जे. शिंगे यांनी केले, तर आभार प्रा. पी. पी. कांबळे यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनास विद्यार्थी व प्राध्यापकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.फोटो ओळ :श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये पाश्चर सप्ताहानिमित्त आंबवलेल्या अन्नपदार्थांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. वंदना पाटील, प्रा. ए. जे. शिंगे, प्रा. पी. पी. कांबळे व मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here