
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
शेतमालाच्या खरेदी–विक्रीची प्रत्यक्ष कार्यपद्धती, बाजारातील व्यवहार आणि आधुनिक कृषी विपणन प्रणाली समजून घेण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व कॉमर्स विभागातील ५० विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शेतमालाची खरेदी-विक्री, लिलाव पद्धत, बाजार समितीची कार्यप्रणाली तसेच शेतकरी, अडते व व्यापारी यांची भूमिका प्रत्यक्ष पाहून समजून घेतली. तसेच ई-नाम योजनेअंतर्गत ई-ऑक्शन प्रणाली, राष्ट्रीय कृषी बाजार योजना, समितीचे भावी प्रकल्प आणि गूळ बाजार याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
बाजार समितीचे उपसचिव वसंत पाटील व योगेश खाडे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कैलास पाटील यांनी मानले.
ही शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र व कॉमर्स विभागाच्या वतीने प्रा. सनी काळे, डॉ. संदीप पाटील, प्रा. ए. बी. वसेकर, प्रा. ओंकार कुलकर्णी तसेच रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांनी आयोजित केली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

