
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची माहिती देताना अधिकारी विजय विलास पाटील; सोबत विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक.
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथील ज्युनिअर विभागाच्या सहकार विषयांतर्गत विद्यार्थ्यांची अभ्यास सहल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना, असळज येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या सहलीदरम्यान कारखान्याचे अधिकारी श्री. विजय विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऊस तोडणीपासून ते साखर उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. ऊस कारखान्यात आल्यानंतर त्याचे वजन, कटिंग, रस काढणे, रसापासून साखर निर्मिती, विविध चाळण्यांद्वारे साखर वेगळी करणे तसेच ५० किलोच्या पोत्यांमध्ये पॅकिंग करून गोदामात साठवणूक कशी केली जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मळीपासून इथेनॉल निर्मिती, बगॅसपासून वीज निर्मिती करून कारखान्याची गरज भागवली जाते व उर्वरित वीज महावितरणला पुरवली जाते, अशी उपयुक्त माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या अभ्यास सहलीसाठी संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सहलीचे यशस्वी संयोजन प्रा. सीमा पाटील यांनी केले.
या सहलीत डॉ. उषा पवार, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. एस. पी. कुंभार, प्रा. विश्वजा पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

