
पन्हाळा | प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पन्हाळा तालुक्यातील निवडे–मोरेवाडी परिसरातून वाहणाऱ्या मनगरी नदीत अज्ञात नराधमांनी मृत कोंबड्या व त्यांची घाण थेट नदीपात्रात टाकल्याने भीषण प्रदूषण निर्माण झाले आहे. या कृत्यामुळे नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले असून जनावरांनी पाणी पिणे बंद केले आहे, तर महिलांना धुणे-भांडे किंवा इतर घरगुती कामासाठी नदीकाठी गेल्यावर तीव्र दुर्गंधीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होत आहे.हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तात्काळ पन्हाळा तहसीलदार मा. माधवी शिंदे ग्रामसेवक अरुणा जगताप यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत यंत्रणा राबवली. प्रशासनाच्या प्रयत्नातून नदीपात्रातील काही मृत कोंबड्या व सडलेली घाण बाहेर काढण्यात यश आले.यावेळी तहसीलदार शिंदे मॅडम व ग्रामसेवक अरुणा जगताप यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,नदीतील पाण्याची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येणार असून, मृत कोंबड्या टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींची चौकशी करून अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर केला जाणार आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.घटनास्थळी निवडे गावचे पोलीस पाटील अरुण श्रीपती पाटील, तलाठी कार्यालयातील कर्मचारी लहू पाडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी सर्जेराव गुरव व युवराज चव्हाण उपस्थित होते. तसेच पाण्याच्या प्रवाहात उतरून जलतरणपटू बंडोपंत यादव यांनी जीव धोक्यात घालून शक्य तितके मृत पक्षी बाहेर काढले.या संपूर्ण घटनेत सर्व शासकीय यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधून प्रशासनाला हलविण्याचे काम युवा लहुजी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (तात्या) तांदळे यांनी केले.नदी ही कोणाची कचराकुंडी नाही. पाणी हे जीवन आहे. अशा अमानुष आणि बेजबाबदार कृत्यांमुळे मानवी आरोग्य, जनावरे व पर्यावरण धोक्यात येत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.


