
पन्हाळा | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
निव्वळ रस्ते नव्हे, तर मृत्यूचे सापळे अशीच सध्या तालुक्यातील रस्त्यांची अवस्था झाली असून, दररोज होणाऱ्या अपघातांना प्रशासनाची अनास्था आणि नियोजनशून्य कामेच जबाबदार असल्याचा संतप्त आरोप स्वाभिमानी संघाजी ब्रिगेडचे पठाळा तालुकाध्यक्ष श्री. शैलेश हिर्डेकर यांनी केला आहे.
तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अनधिकृत व अवैज्ञानिक पद्धतीने टाकलेले गतिरोधक, रस्त्यावर मोकाट जनावरे, अंधारात न दिसणारे वळण, तसेच कोणतीही सूचना फलक नसलेले धोकादायक ठिकाणे यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
विशेषतः एसटी बस, ट्रक व जड वाहने या रस्त्यांवरून ये-जा करत असताना अचानक ब्रेक मारावे लागतात. परिणामी वाहन घसरून भीषण अपघात होत असून, अनेक निष्पाप नागरिक आपला जीव गमावत आहेत.
“आज एखादी व्यक्ती कामावरून घरी निघते, पण ती जिवंत परत येईल याची खात्री देता येत नाही,” अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त वेगावर बोट ठेवून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे; मात्र रस्त्यांची दयनीय अवस्था, चुकीचे गतिरोधक आणि नियोजनाचा अभाव याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा गंभीर आरोप हिडकर यांनी केला.
प्रशासनाने तात्काळ वैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक बसवावेत, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा स्वाभिमानी संघाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

