कोतोलीवर शोककळा… ऐन उमेदीत विनायक तुरंबेकर यांचे अकाली निधन

0
1430

कोतोली | प्रतिनिधी : पांडुरंग फिरिंगे
कोतोली येथील विनायक नामदेव तुरंबेकर यांचे आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऐन उमेदीच्या काळात काळाने घाव घातल्याने संपूर्ण कोतोली परिसरावर शोककळा पसरली आहे. ही घटना केवळ एक व्यक्ती गेल्याची नसून, एका हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या अकाली अस्ताची आहे.
विनायक हे एका संस्थेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. कामातील प्रामाणिकपणा, माणसांशी जोडलेपण आणि मदतीस तत्पर स्वभाव यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. कोणत्याही कार्यक्रमात, सुख-दुःखात ते आवर्जून उपस्थित असत. कालच ते एका शुभ कार्यात सहभागी झाले होते आणि काही तासांतच अशी दुःखद बातमी येईल, यावर कुणाचाच विश्वास बसत नाही.
अलीकडच्या काळात तरुण वयातही हृदयविकाराचे झटके येत असल्याच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण असतानाच, विनायक यांच्या निधनाने ही भीती अधिकच गडद झाली आहे. “इतक्या लवकर, इतक्या अचानक…” हे शब्द प्रत्येकाच्या ओठांवर आहेत.

विनायक यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. गावातील चौगुले कुटुंबातील पत्नी असल्याने नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण गावावर मोठा दुखवटा पसरला आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात हळहळ आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी कोतोली येथे होणार आहे.
हसरा चेहरा, आपुलकीची भाषा आणि माणुसकीची ओळख मागे ठेवून गेलेला हा तरुण आज कोतोलीच्या आठवणींमध्ये अढळ स्थान घेऊन गेला आहे.
कोतोलीने आज आपला एक जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here