कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के – पाटिल
भूम (जि. धाराशिव) : गुरांच्या चाऱ्यासाठी शेतातील ऊस घेऊन घरी परतत असताना अचानक बैल उधळल्यामुळे बैलागडी उलटली. या दुर्घटनेत ६५ वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेवून मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री भूम तालुक्यातील उळूप शिवारात घडली.
शेतकरी अर्जुन राजाराम वरळे (६५) हे मंगळवारी सकाळी बैलगाडी घेऊन शेतात गेले हाेते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास गुरांसाठी ऊस ताेडून ताे बैलगाडीत भरून गावाकडे परतत हाेते. शेतातून बैलगाडी बाहेर पडली असता, अचानक दाेन्ही बैल उधळले.
त्यामुळे उसाने भरलेली ही बैलगाडी उलटली. या दुर्घटनेत शेतकरी वरळे गंभीर जखमी झाले. आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने भूम येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले.
रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतरन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.
चाऱ्यासाठी ऊस आणायला गेले अन्…
भूमसह परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस नाही. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
परिणामी शेतकरी उसाचा वापर चारा म्हणून करीत आहेत. हाच चारा आणण्यासाठी वरळे बैलगाडी घेऊन शेतात गेले हाेते. चारा घेऊन परतत असतानाच काळाने गाठले.