
कोल्हापूर / प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूरच्या राजकीय व सहकार क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख असलेले ‘गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) हे शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.या घडामोडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून विश्वास पाटील यांच्या पक्षांतराबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळत असून, शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आयोजित विशेष कार्यक्रमात पाटील हे आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.विश्वास पाटील यांचा हा निर्णय केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सहकार क्षेत्रातही मोठे पडसाद उमटवणारा ठरणार आहे.‘गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणात त्यांची मजबूत पकड असून, त्यांच्या भूमिकेमुळे संघातील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यांच्या या ‘यु-टर्न’मुळे गोकुळमधील विरोधी गट अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसची पारंपरिक ताकद असलेल्या अनेक भागांमध्ये विश्वास पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.मात्र त्यांनी मुख्यमंत्री व सत्ताधारी गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा राजकीय सुरुंग मानला जात आहे.एकूणच, विश्वास पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, येत्या काळात सहकार आणि राजकारणातील समीकरणे वेगाने बदलताना दिसणार आहेत.

