
कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ने सहकार क्षेत्रात नवा इतिहास रचत प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा अभूतपूर्व टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास, संघटित प्रयत्न, पारदर्शक व उत्पादकाभिमुख कारभार यांचे हे ठळक प्रतीक ठरले आहे.
आज गोकुळकडून एकूण २० लाख ०५ हजार लिटर दूध संकलन झाले असून त्यात १०.७३ लाख लिटर म्हैस दूध व ९.३२ लाख लिटर गाय दूधाचा समावेश आहे.
याबाबत बोलताना गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “प्रतिदिन २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार होणे ही गोकुळच्या सातत्यपूर्ण प्रगतीची पावती आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास, उत्कृष्ट सेवा-सुविधा व पारदर्शक कारभारामुळेच हे यश शक्य झाले आहे.”

दूध उत्पादकांसाठी जास्तीत जास्त दूध खरेदी दर, अंतिम दूध दर फरक, पशुवैद्यकीय सेवा, दर्जेदार पशुखाद्य पुरवठा, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना तसेच विविध कल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबविल्याने दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्वांचा थेट परिणाम म्हणून गोकुळवरील उत्पादकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.
दूध उत्पादक, दूध संस्था, कर्मचारी, वितरक व ग्राहक यांच्या एकत्रित योगदानातून गोकुळची ही दिमाखदार वाटचाल सुरू असून, भविष्यात २५ लाख लिटर प्रतिदिन दूध संकलनाचा नवा टप्पा गाठण्याचा निर्धार चेअरमन नविद मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे.

